'एकटा माणूस परिवर्तन घडवतो, पण...' नोटाबंदीवर सेहवागचे षटकार
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 24 Nov 2016 12:05 AM (IST)
मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या मैदानात खेळत नसला, तरी सोशल मीडियावर त्याच्या चौकार आणि षटकारांचा सामना अनेकांना करावा लागतो. देशविदेशातील प्रत्येक घटनेवरील त्याचे हटके ट्वीट त्याच्या चाहत्यांसोबतच इतरांचेही मनोरंजन करतात, शिवाय विरोधकांचीही बोलती बंद करतात. '' एकटा माणूस परिवर्तन घडवतो, मात्र विवाहीत पुरुष भाजी किंवा कुत्र्यांना फिरवण्याचे काम करतो.'' असं मिश्किल मत त्याने नोटाबंदीच्या मुद्द्यावर मांडलं. एके काळचा आपला सहकारी फलंदाज गौतम गंभीरलाही त्याने कोपरखळ्या मारल्या आहेत. ''जेव्हा क्रिकेटच्या मैदानात रन्स बनायचे नाहीत, तेव्हा गौतम गंभीर हनुमान चालीसा गायचा.'' असा टोला त्याने लगावला. गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या प्रीमियर लीगच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्याने षटकार आणि चौकार लगावले. ड्रेसिंग रुममधील धमाल सांगताना तो म्हणला की, '' कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा 300 करत होतो, तेव्हा एका गाण्याचे शब्द आठवत नव्हते. तेव्हा मी माझ्या सहकारी 12 खेळाडूंना त्या गाण्याचे शब्द आईपॅडवर शोधून आणायला सांगितले होते.'' ''बायको ही अंपायरसारखी असते. तिच्यासमोर आपण अपील करू शकत नाही. आपण नॉन स्ट्राइकर एन्डला असल्यासारखे खेळावे. तसेच सासू ही ऑस्ट्रेलियन स्लेजिंगसारखी असते. पण मी अम्पायर सोबतही स्लेजिंग केले आहे,'' असे किस्से त्याने यावेळी सांगितले. वीरुने यावेळी कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीलाही उपदेशाचे डोस पाजले. विराट कोहलीने आपले नाव बदलून बादल ठेवायला हवं, तसंच शोएब अख्तरसाठी आ देखे जरा हे गाने आणि मुरलीधरनसाठी तू चीज बड़ी है मस्त मस्त हे गाणं सूट होत असल्याचं तो म्हणाला.