वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या निक्की हेली यांची संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेच्या राजदूतपदी निवड केली आहे. निक्की हेली यांनी देखील ही नियुक्ती स्वीकारल्याची माहिती आहे.
व्हाईट हाऊसमधील सत्ता परिवर्तनानंतर अमेरिकेच्या प्रशासनात कॅबिनेट स्तरीय पदावर नियुक्ती होणाऱ्या 44 वर्षीय निक्की हेली या पहिल्याच भारतीय महिला आहेत. या निर्णयाची अधिकृत घोषणा नंतर करण्यात येणार आहे.
निक्की हेली सध्या दक्षिण कॅरोलिनाच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. ट्रम्प यांच्या सल्लागारांनी निक्की हेली यांच्या नावाची शिफारस केली होती.
निक्की हेली आणि ट्रम्प यांची नुकतीच न्यूयॉर्क येथील ट्रम्प टॉवरमध्ये भेट झाली होती. ट्रम्प प्रशासनात नियुक्ती मिळवणाऱ्या निक्की हेली या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या सर्वात तरुण राज्यपाल होण्याचा त्यांना मान मिळाला होता.