मुंबई : भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं इटालियन ओपनचं विजेतेपद मिळवलं. वर्ल्ड नंबर वन सानिया आणि मार्टिनानं रशियाच्या एलेना व्हेसनिना आणि एकाटरिना माकारोव्हा या जोडीवर 6-1, 6-7 आणि 10-3 अशी मात केली.   सानिया आणि मार्टिनानं क्ले कोर्टवर सलग तिसऱ्या स्पर्धेत फायनल गाठली होती. याआधी स्टुटगार्ट आणि माद्रिदमधील स्पर्धांमध्ये सानटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पण आता इटालियन ओपन जिंकून सानिया आणि मार्टिनानं यंदाच्या मोसमातलं पाचवं विजेतेपद साजरं केलं.   सानिया-मार्टिनानं यंदा ऑस्ट्रेलियन ओपनसोबतच सिडनी, ब्रिस्बेन आणि सेंट पीटर्सबर्गमधील स्पर्धाही जिंकल्या होत्या. त्यानंतर इटालियन ओपनचं विजेतेपद हे सानिया आणि मार्टिनाचं एकूण चौदावं विजेतेपद आहे, तर सानियाचं हे कारकीर्दीतलं सदतिसावं विजेतेपद आहे.