मुंबई : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सानियाने आज (30 ऑक्टोबर) पहाटे मुलाला जन्म दिला आहे. तिचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

शोएब मलिकने आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्विटरवर सानिया आई बनल्याची गोड बातमी दिली. "कळवताना अतिशय आनंद होतोय, मुलगा झाला आणि सानियाची प्रकृती उत्तम असून नेहमीप्रमाणे खंबीर आहे, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभार," असं शोएबने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


शिवाय या ट्वीटसह त्याने #BabyMirzaMalik हा हॅशटॅगही वापरला आहे. विशेष म्हणजे गरोदरपणात एका प्रश्नाला उत्तर देताना सानिया म्हणाली होती की, "त्यांच्या बाळाच्या नावात मिर्झा आणि मलिक आडनाव असेल."

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने 2010 मध्ये लग्न केलं होतं. त्यांचं हे पहिलं अपत्य आहे. पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केल्याने सानिया अनेक वेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असायची. पण तिने कायमच या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं.