मुंबई : तुम्ही जर बटाटे फ्रिजमध्ये ठेवत असाल किंवा अति उच्च तापमानाला शिजवत असाल, तर जरा सावधान ! यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. खरंच अस होतं का? आपण फ्रिजमध्ये ठेवत असलेल्या अनेक पदार्थांमध्येही फक्त बटाट्यामुळे हा धोका होतो की इतरही भाज्या आहेत? या प्रश्नांची उत्तरं 'वायरल चेक'मधून शोधण्याचा प्रयत्न केला आहे.


फ्रिजचा वापर आपण सर्रास फळं-भाज्या आणि अन्नपदार्थ ठेवण्यासाठी करतो. पण थंड तापमानात भाज्या ठेवणं महागात पडू शकतं. त्यातही बटाटे थंड तापमानात ठेवणं आरोग्यास हानिकारक पडू शकतं! आपण बटाटे फ्रिजमध्ये ठेवतो त्यावेळी फ्रिजमधील थंड तापमानामुळे बटाट्यामधील स्टार्चचं रुपांतर साखरेत होतं आणि त्या साखरेचं एक्रीलअमाईड या केमिकलमध्ये.

फ्रिजमधील बटाटे फ्राय केल्यावर यातील साखर एक्रीलअमाईड तयार करतं. या केमिकलचा वापर पेपर बनवण्यासाठी, प्लास्टिक तयार करण्यासाठी आणि कपड्यांना डाय करण्यासाठी करण्यात येतो. अमेरिकेत तर या एक्रीलअमाईडवर बंदी असून याचा वापरही टाळला जातो.

120 अंशांवरील तापमानावर थंड बटाटे तळल्यावर कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बटाटे रुम टेम्प्रेचरला आणि कोरड्या जागी ठेवा. त्यामुळे 'माझा'च्या पडताळणीत हा वायरल मेसेज खरा ठरला आहे.