मुंबई : भारताच्या दोन महिला खेळाडूंनी रियो ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकून इतिहास घडवला आहे. त्यामुळेच 'खेलरत्न' हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार यंदा प्रथमच चार खेळाडूंना बहाल करण्यात येण्याची शक्यता आहे.

 
'खेलरत्न' आणि 'अर्जुन' पुरस्कार समितीने जिम्नॅस्ट दीपा कर्माकर व नेमबाज जीतू राय यांच्या नावाची 'खेलरत्न' पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. या दोघांबरोबरच रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक आणि रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनाही देशातील या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने गौरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणाऱ्या वर्षात एकापेक्षा जास्त खेळाडूंना 'खेलरत्न' पुरस्कार देण्याची सोय शासनाच्या एका विशेष नियमात करण्यात आली आहे. दीपा कर्माकर आणि जीतू राय यांची या पुरस्कारासाठी आधीच शिफारस झालेली असून साक्षी आणि सिंधूचे नावही या यादीत जोडले जाण्याचे संकेत आहेत.

 
यापूर्वी 2009 मध्ये कुस्तीपटू सुशील कुमार, बॉक्सर विजेंदर सिंग आणि मेरी कोम या तिघांचा एकाच वेळी 'खेलरत्न' पुरस्काराने गौरव झालेला आहे. 29 ऑगस्ट रोजी क्रीडादिनानिमित्त राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते खेळाडूंचा 'खेलरत्न' आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान होणार आहे.