नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने आज (24 डिसेंबर) मोठा निर्णय घेत नवनिर्वाचित कुस्ती संघटना विसर्जित केली. गुरुवारी 21 डिसेंबर रोजी WFI निवडणुका पूर्ण झाल्यापासून हा वाद टोकाला गेला होता. साक्षी मलिकने निवडणुकीवर दु:ख व्यक्त करत पत्रकार परिषदेत शूज काढून टेबलावर ठेवले होते आणि कुस्ती सोडून देण्याचा निर्णय घेतला होता.
क्रीडा मंत्रालयाकडून महासंघ निलंबित
मंत्रालयाने नवनिर्वाचित महासंघ निलंबित केल्यावर माजी कुस्तीपटू साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली. सरकारशी भांडण नाही, ही लढत फक्त खेळाडूंसाठी होती. मला मुलांची काळजी वाटते, असं तिनं सागितलं.
मला अद्याप लेखी काहीही मिळालेलं नाही
या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना साक्षी मलिक म्हणाली, "मला अद्याप लेखी काहीही दिसलेलं नाही. केवळ संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे की संपूर्ण संस्थेला निलंबित करण्यात आले आहे, हे मला माहीत नाही. आमचा लढा विरोधी सरकार विरोधात नव्हता. आमचा लढा महिला कुस्तीपटूंसाठी आहे. मी माझी निवृत्ती जाहीर केली आहे, पण आगामी कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे."
निवडणुकीत संजय सिंह विजयी
नुकत्याच झालेल्या भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंह यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी कुस्तीपटू अनिता शेओरानचा पराभव केला. संजय सिंह यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कुस्तीपटूंनी विरोध केला आणि साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. यानंतर बजरंग पुनियाने पद्मश्री परत केले. इतर काही पैलवानांनीही विरोध केला. यानंतर आता रविवारी क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे.
गोंडात चॅम्पियनशिप का आयोजित करण्यात आली होती?
दुसरीकडे, भाजप खासदार आणि माजी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. गोंडात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 'प्रत्येक महासंघातील लोकांनी हात वर केले की आम्ही ती चालवू शकत नाही. 15-20 वर्षांच्या मुलांचे भविष्य खराब होऊ नये, यासाठी ही स्पर्धा नंदनी नगरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा चार दिवसांत होणार होती. देशातील 25 पैकी 25 महासंघांनी हात वर केले आणि ही स्पर्धा 31 डिसेंबरपर्यंत होणार होती.
WFI चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, 'आमच्याकडे नंदिनीनगरमध्ये सर्व पायाभूत सुविधा आहेत. याला सर्व महासंघांनी संमती दिली. तरीही मी सरकारला विनंती करतो की ही स्पर्धा त्यांच्या देखरेखीखाली घ्यावी. मी गेल्या 12 वर्षात केलेल्या कामाच्या आधारे माझे मूल्यमापन केले जाईल. मी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. आता हे निवडून आलेले लोक त्यांचा निर्णय घेतील. माझ्या लोकसभा निवडणुका येत आहेत, त्याची तयारी मला करायची आहे. आता येणारे नवे महासंघ न्यायालयात जायचे की सरकारशी बोलायचे हे ठरवेल.
इतर महत्वाच्या बातम्या