नवी दिल्ली: रिओ ऑलिम्पिकमधील 58 किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणारी साक्षी मलिक आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षी मलिकने ही माहिती दिली.


 

साक्षीला या मुलाखतीवेळी तिच्या होणाऱ्या जोडीदारासंदर्भात प्रश्न विचारला असता, तिने त्याचे नाव सांगण्याचे टाळले. पण तोही आपल्याप्रमाणे कुस्ती पैलवान असल्याची माहिती तिने यावेळी दिली.

 

साक्षी म्हणाली की,'' माझ्या जोडीदाराच्य नाव अद्याप उलगडणार नसून, तोही माझ्यासारखा पैलवान आहे. त्यामुळे आगामी टोकीयो ऑलिम्पिकच्या तयारीमध्ये त्याच्याकडून कोणताही अडथळा होणार नाही. उलट तो मला सतत प्रोत्साहन देतो. माझ्या स्वप्नांना स्वत:ची स्वप्ने मानतो. त्यामुळे लग्नानंतरही मला एका पतीपेक्षा चांगला मित्र मिळणार आहे. तसेच माझ्या ऑलिम्पिक तयारीत तो मला सहकार्य करेल. त्यामुळे माझ्या कुस्तीच्या सरावात लग्नानंतर कोणतेही अडथळे येणार नाहीत,'' असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.

 

रिओ ऑलिम्पिकमध्ये दिग्गजांकडून भारताला पदक न मिळाल्याने क्रीडा जगतात निराशेचे वातावरण होते. अशावेळी साक्षीने भारताला पहिले पदक मिळवून देत, भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा पल्लवीत केल्या. साक्षीच्या पदक कमईने ती एका रात्रीत स्टार झाली. रिओहून मायदेशी परतल्यानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत तिचे जंगी स्वागत करण्यात आले.