लॉडरहिल : लॉडरहिलचा दुसरा ट्वेन्टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला. आधी तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडलेली सुरुवात आणि मग पावसानं आणलेला व्यत्यय यांमुळे या सामन्यात चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

 
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता या लढतीला सुरुवात होणं अपेक्षित होतं. पण पाऊस आल्याने प्रत्यक्षात तब्ब्ल चाळीस मिनिटं उशिराने सामना सुरु झाला. तांत्रिक कारणांमुळे हा उशीर झाल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं.

 
खेळ सुरु झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा डाव 19 षटकं आणि चार चेंडूंमध्ये 143 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर भारतानं दोन षटकांत बिनबाद पंधरा धावांची मजल मारली. त्यानंतर पाऊस कोसळू लागला आणि भारतीय संघाच्या मालिकेत बरोबरी साधण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या.