सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालनं पी.व्ही. सिंधूला हरवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट सरळ जिंकून सायनानं बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.


एकूण 56 मिनिट चाललेल्या या सामन्यात सायनाने पी.व्ही. सिंधूचा थेट पराभव केला. सायनाने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली होती. तिने 8-4 ची आघाडी मिळवत सिंधूला एकही गुण घेऊ दिला नाही. पण तरीही सिंधूनेही प्रयत्नांची पराकाष्टा करत 18-20 असा स्कोर केला. पण पुढच्याच क्षणात सायनाने एक गुण मिळवत 21-18 असा अशी आघाडी मिळवली.

तर दुसऱ्या डावात सिंधूने पुनरागमन करत 7-5 अशी आघाडी मिळवली. पण सायनाने खेळ पलटत 8-10 असा स्कोर केला. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दोघींनीही 20-20 असे समसमान गुण मिळवले होते. पण पुढील काही क्षणातच सायनाने बाजू पलटत, पी.व्ही सिंधूचा पराभव केला.

दरम्यान, या सामन्यात सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला, तरी भारताला पारड्यात रौप्य पदकही मिळालं आहे. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे आता भारताच्या पारड्यात सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्हीही पदकं पडली.

दुसरीकडे पुरुष एकेरी गटात वर्ल्ड नंबर वन किदांबी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वी ने 19-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. या पराभवामुळे श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.