मुंबई : भारताची फुलराणी सायना नेहवाल लवकरच आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. सायना नेहवाल वर्षअखेरीस विवाहबंधनात अडकणार आहे. बॅडमिंटनपटू पारुपली कश्यपसोबत 16 डिसेंबर रोजी सायना लग्नगाठ बांधणार आहे.

16 डिसेंबरला होणाऱ्या लग्नसोहळ्यात केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनाच आमंत्रण देण्यात आलं आहे. तर 21 डिसेंबरला भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

सायना आणि कश्यप जवळपास दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. परंतु दोघांनी कधीही याला दुजोरा दिला नव्हता. आम्ही केवळ चांगले मित्र असून प्रॅक्टिस पार्टनर आहोत, असं ते सांगायचे. सोशल मीडियावर दोघे फोटो शेअर करायचे, पण त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी ना कोणी असायचं.

मात्र आता दोघांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 28 वर्षीय बॅडमिंटन स्टार सायना जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. तर 32 वर्षीय पी. कश्यप जागतिक क्रमवारीत 57 क्रमांकावर आहे.