पिंपरी चिंचवड : विनयभंगाची तक्रार दाखल करायला आलेल्या आयटी अभियंता तरुणीला पोलिसांनी चार तास बसवून ठेवल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत घडली. 9 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली होती. संबंधित तरुणीने याप्रकरणी पोलीस आयुक्तांनाच आता नोटीस पाठवली आहे.
तक्रार दाखल करुन न घेता तरुणाला परत पाठवण्यात आलं. तो आरोपी पुन्हा दिसला. तेव्हा फिर्यादी आणि आसपासच्या लोकांनाच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडायला सांगितलं. पोलिसांचा प्रताप इथेच थांबला नाही तर तक्रार करू नये म्हणून पोलिसांनीच धमकावलंही, असा आरोप तरुणीने केलाय. पीडित तरूणीने वकिलाकडून पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आता मात्र हिंजवडी पोलिसांना हे प्रकरण भोवताना दिसतंय.
नऊ सप्टेंबरच्या तरुणी पहाटे कंपनीतून हॉस्टेलमध्ये परतली. कपडे बाहेरील दोरीवर टाकण्यासाठी ती बाहेर आली तेव्हा भिंतीवरून उडी मारून तिथे एक तरुण आला आणि त्याने तिला मिठी मारली. यानंतर संबंधित तरुणीने आरडाओरडा केला त्यामुळे तरुण पळून गेला.
तरूणीने हिंजवडी पोलीस स्टेशन गाठलं. मात्र पोलिसांनी पीडित तरुणीलाच चार तास बसवून ठेवलं आणि माघारी पाठवलं. लगतच्या एका सीसीटीव्हीत आरोपी तरुण भिंतीवरून उडी मारताना दिसतोय, ते दृश्य पाहून एका दुकानदाराने त्याला ओळखलं.
सुदैवाने तो त्याच परिसरात दिसला, मग पीडित महिला आणि स्थानिकांनी पोलिसांना संपर्क साधला. मात्र निर्ढावलेल्या पोलिसांनी त्यांनाच पाठलाग करायला सांगितलं. त्यात तो निसटला. ती पुन्हा तक्रार द्यायला आली असता, पीडितेला धमकावण्यात आलं, असा आरोप करण्यात आलाय.
यानिमित्ताने रक्षकच भक्षक झाल्याचं पीडितेला कळताच, तिने वकिलांचा आधार घेतला. थेट पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनाच नोटीस धाडली. तेव्हा पोलिसांची ही असंवेदनशीलता समोर आली. त्यामुळे आयुक्तांनी हिंजवडी पोलिसांवरच कारवाई करणार असल्याचं जाहीर केलंय. याप्रकरणी आता गुन्हाही दाखल करून घेण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिसांनी विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी तरुणीला चार तास बसवून ठेवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2018 07:59 AM (IST)
पोलिसांच्या या असंवेदनशीलतेनंतर पीडित तरुणीने थेट पोलीस आयुक्तांनाच वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण हिंजवडी पोलिसांच्या अंगाशी येताना दिसतंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -