नवी दिल्ली : भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल सर्वोच्च दर्जाचं बॅडमिंटन खेळण्याच्या दृष्टीनं तंदुरुस्त झाली असून, सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी ती उत्सुकही दिसत आहे.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं आव्हान स्वीकारायला आपण सज्ज आहोत, असं सायना आत्मविश्वासानं सांगते, त्या वेळी अजिबात आश्चर्य वाटत नाही.

बॅडमिंटनविश्वातल्या प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटनला पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. रिओ ऑलिम्पिकनंतर दुखापतग्रस्त गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून सायना नेहवाल पूर्णपणे सावरली आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी तिला अर्थातच कठोर मेहनतही घ्यावी लागली आहे.

जगातली एक सर्वोत्तम बॅडमिंटनपटू बनण्याचं आपलं लक्ष्य हे त्यामागचं कारण असल्याचं सायनानं सांगितलं. 2015 सालच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला उपविजेतेपदावर समाधान मानलं होतं.

सदर स्पर्धेच्या फायनलवर कॅरोलिना मरिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. या वेळी आपण फिटनेस आणि खेळावर अधिक मेहनत घेतली असून, कुणाचंही आव्हान स्वीकारायला आपण सज्ज असल्याचं सायनानं आत्मविश्वासानं सांगितलं.