मुंबई : भारताच्या फुलराणी सायना नेहवाल कोरोना निगेटिव्ह असून ती बुधवारी होणाऱ्या थायलँड ओपनमध्ये सहभागी होणार आहे. सायना नेहवाल आणि एचएस प्रणयचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ती थायलँड ओपनमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, आता तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ती थायलँड ओपनमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


याआधी लंडन ऑलिम्पिक (2012) ची कांस्यपदक विजेत्या सायनाने बीडब्ल्यूएफ द्वारे कोविड-19 प्रोटोकॉल अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त करत ट्वीट केलं होतं. सायनाने ट्वीट केलं की, "तपासणीमध्ये सर्व निगेटिव्ह आल्यानंतरही फिजियो आणि प्रशिक्षक आम्हाला भेटू शकत नाहीत? आम्ही चार आठवड्यांपर्यंत स्वतःला फिट कसे ठेवणार. आम्हाला चांगल्या परिस्थिती खेळायचं आहे. कृपया यावर मार्ग काढा."


थायलँडमध्ये आहे भारतीय टीम


भारताची संपूर्ण टीम बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सुपर 1000 स्पर्धेत भाग घेण्यासाठी थायलँडच्या राजधानीत आहे. सायनाने आणखी एक ट्वीट करत लिहिलं आहे की, "आम्हाला वॉर्म अप/ कूल डाउन /स्ट्रेचिंग / च्या माध्यमातून वेळ दिला जात नाही. आम्ही इथे जगभरातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंसोबतच्या स्पर्धेबाबत बोलत आहोत." ते पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही फिजियो आणि ट्रेनर यांना इथे घेऊन येण्यासाठी खूप खर्च केला आहे. जर ते आमची मदद करु शकणार नाहीत, तर मग ही गोष्ट आम्हाला आधीच का सांगितली नाही?"


दरम्यान, एच.एस.प्रणय, पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा, ध्रुव कपिला, मनु अत्री हेदेखील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बँकॉकला पोहोचले आहेत. पारुपल्ली कश्यपने पत्नी सायनासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलं होतं की, "बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर आम्ही थायलँड स्पर्धेतून खेळात वापसी करत आहोत. खूप उत्सुक आहे."