मुंबई : मुंबईत उद्या लस येणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईत कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती. मात्र, या स्टोरेजचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेल येथील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला जाणार असल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कशी आहे लसीकरणाची तयारी?
मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एकावेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे 10 लाख लसी साठवता येऊ शकतात. अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे.
देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्यावर आता उद्या मुंबईत लस येणार आहे. मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर अशा 2 लाख लोकांची नावे कोवीन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख लोकांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. त्याप्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे. लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे कोल्डस्टोरेजमध्ये साठवली जाईल. मात्र, लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी आहे.
5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग
मुंबई महानगरपालिकेने 275 मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. त्यांच्या माध्यमातून 2500 कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. 5 कर्मचाऱ्यांची एक टीम या प्रमाणे 500 टीम तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे म्हणून आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी 5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे असे काकाणी यांनी सांगितले.
सभागृह, शाळांमध्येही होणार लसीकरण
मुंबईत लसीकरण करता यावे म्हणून केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्येही लसीकरण केले जाणार आहे. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केले जाणार आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करता यावे यासाठी येत्या काही महिन्यात शाळांमध्ये आणि विभागातील सभागृहे ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
दिवसाला किमान 14 हजार लोकांना लस
पालिकेच्या केईएम, सायन,नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी 9 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी 72 बूथ असणार आहेत. प्रत्येक बुथवर नर्ससह प्रत्येकी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक 5 बुथसाठी एक डॉक्टर असणार आहे. या बुथवर एका शिफ्टमध्ये किमान 100 जणांना लस देता येणार आहे. दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. एका दिवसाला किमान 14 हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे
कांजूरच्या कोल्डस्टोरेजचे काम अपूर्ण
पालिकेने लस साठविण्यासाठी कांजूरमार्ग येथील आरोग्य केंद्राची निवड मध्यवर्ती लस साठवणूक केंद्रासाठी केली असली तरी या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता लसीचा साठा हा एफ दक्षिण येथील लस साठवणूक केंद्रात करण्यात येणार आहे
पंतप्रधान साधणार संवाद
येत्या 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालिकेच्या कूपर रुग्णालयातील लाभार्थी आणि लस देणारे डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोवीन अॅपमध्ये आलेल्या अडचणी यावेळी पंतप्रधान जाणून घेणार आहेत. यासाठी पालिका प्रशासनाला टू वे व्हिडिओ कॉन्फरन्सिगची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.