मुंबई : सायना या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेत्री परिणीती चोप्राने भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची तिच्या हैदराबादच्या घरी जाऊन भेट घेतली. सायना नेहवालसोबतची झालेली ही भेट अगदीच खास होती असं परिणीती चोप्राने सांगितलं आहे. भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्यात येत असून परिणीती चोप्रा त्यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सायनाला भेटल्यावर आपण आपल्या आयुष्यात कधी कोणत्याही स्पोर्ट्समध्ये भाग घेतला नाही असं परिणीती चोप्राने सांगितले. त्यावर सायना परिणीतीला म्हणाली की, मला असा विश्वास आहे की तुही चांगल्या प्रकारे बँडमिंटन खेळू शकतेस.
परिणीती चोप्रा म्हणाली की, "मी सायनाचे घर पाहिलं. तिच्या घरात फक्त रॅकेट्स, शटक कॉक्स, मेडल्स, आणि ट्राफीज या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं. तिचे इतर साहित्य खूप कमी आहे आणि या खेळाच्या संबंधित गोष्टी जास्त आहेत. त्यामुळे या बायोपिकमुळे माझ्यावर किती मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला झाली आहे. सायनाला भेटून आल्यानंतर माझ्यात नवा उत्साह संचारला आणि मी दुप्पट उर्जेने काम सुरु केलं. या चित्रपटात जर मी तिच्या प्रमाणे खेळू शकलो तर मी स्वत: ला यशस्वी समजेन."
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आपला आगामी चित्रपट 'सायना'मध्ये दिसून येणार आहे. अभिनेत्री बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये फारशी अॅक्टिव्ह नव्हती. कदाचित याचं कारण गेल्या वर्षी लागू करण्यात आलेला लॉकडाऊनही असू शकतो. अशातच परिणीती चोप्राच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये परिणीती सायना नेहवालची भूमिका साकारताना दिसणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर या महिन्याच्या शेवटी सायना नेहवालवर आधारित बायोपिक लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा चित्रपट होळीच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट प्रेक्षकांसाठी 26 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. 'सायना' चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलं आहे. चित्रपटाचं संगीत अमाल मलिक यांनी दिलं आहे. यापूर्वी अमाल मलिक यांनी 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्येही संगीत दिलं होतं.
बॅडमिंटन क्षेत्रात सायनाची कामगिरी, आतापर्यंत तिच्या वाट्याला आलेले यशापयशाचे क्षण, या प्रवासात तिच्या पालकांपासून ते अगदी प्रशिक्षकापर्यंतची भूमिका या सर्वच गोष्टींवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्यात येणार आहे. खुद्द परिणीतीनं या चित्रपटासाठी कमालीची मेहनत घेतली, अनेक प्रशिक्षण सत्रांमध्ये ती सहभागी झाली, एका खेळाडूचं जीवन ती या चित्रपटाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जगली.
चित्रपटाची पहिली झलक अर्थात चित्रपटाचा टीझर परिणीतीनं प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर सध्या कलाविश्वात अनेकांचं लक्ष वेधत आहे. सायना नेहवालच्या भूमिकेत झळकणाऱ्या परिणीतीनं या चित्रपटासाठी तिच्या शरीरयष्टीपासून ते अगदी चेहऱ्याच्या ठेवणीपर्यंत अनेक गोष्टींबाबतचे बारकावे टीपल्याचं दिसत आहे. सायनाप्रमाणेच हुबेहुब दिसणारी परिणीती क्रीडारसिकांच्याही मनाचा ठाव घेऊन जात आहे.