नवी दिल्ली : देशात सातत्याने वाढणाऱ्या इंधानांच्या किंमतीवर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. या मागणीवरुन सोमवारी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना आणि शिरोमणी अकाली दर या पक्षांनी संसदेत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर सरकारने चर्चा करावी अशी मागणी केली. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि लोकसभा अध्यक्षांच्या पोडियमजवळ पोहचून 'एलपीजीची वाढलेली किंमत मागे घ्या आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करा' अशी घोषणाबाजी सुरु केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शून्य प्रहरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर चर्चा करावी अशी मागणी केली. 


PMJDY: जनधन खातेधारक महिलांची संख्या 55 टक्के, आतापर्यंत उघडले 41.93 कोटी खाते 


आजच्या दिवशी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक घरात नळाचे पाणी आणि देशांतील नद्यांचे प्रदूषण या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 


देशातील तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांत आणि पद्दुचेरीमध्ये मार्च- एप्रिल या काळात निवडणूका होणार आहेत. त्यामुळे संसदेतील अनेक खासदार हे अनुपस्थितीत आहेत. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी संसदेतील खासदारांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ही 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली होती. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेली शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस बरोबर 20 पेक्षा जास्त विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला होता. 


Petrol and Diesel price | सलग नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर