मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा फलंदाजी करतो, तेव्हा त्याला रोखणं सोपं नसतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणेच कोहलीनेही अनेक विक्रम आपल्या नवावावर केले आहेत. दमदार फलंदाजी आणि धावांच्या भुकेमुळे कोहली तेंडुलकरचे काही विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. मात्र विराट कोहलीला सचिनचा एक विक्रम मोडता येणार नाही, असं टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचं म्हणणं आहे.


विराट कोहली या पीढीचा सर्वोत्तम फलंदाज आहे. पण तो सचिन तेंडुलकरचा एक विक्रम वगळता बहुतांश सगळे विक्रम मोडू शकतो, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

"सध्याच्या घडीला कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि ज्या हिशेबाने तो धावा करत आहे, त्याची बरोबरी कोणीच करु शकत नाही. मला विश्वास आहे की, तो सचिन तेंडुलकरच बहुतांश विक्रम आपल्या नावावर करेल. मात्र सचिनचा असा एक विक्रम आहे, जो कोणीही मोडू शकत नाही. हा विक्रम आहे 200 कसोटी सामने खेळण्याचा. मला वाटत नाही की कोणीही कसोटी क्रिकेटमध्ये एवढे सामने खेळू शकतो.

सचिनच्या विक्रमापासून कोहली किती दूर?

विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग दोन शतकं केली. आता त्याच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 43 शतकं जमा आहेत. तो सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमापासून फार दूर नाही.

सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये 44.83 च्या सरासरीने 18,426 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 230 वनडे डावात 60.31 च्या सरासरीने 11,520 धावा बनवल्या आहेत.

कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर इथे कोहली सचिनच्या विक्रमाच्या अर्ध्यापर्यंत पोहोचला आहे. विराट कोहलीने 77 कसोटी सामन्यांच्या 131 डावांमध्ये 25 शतकं केली आहे. तर सचिनने 329 डावांमध्ये 51 शतक लगावली आहेत.

मात्र सचिनचा 200 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम कोहलीसह कोणताही खेळाडू मोडू शकत नाही, असं सेहवागला वाटतं.