मुंबई : आयकर अपीलेट लवादच्या (आयटीएटी) मुंबई खंडपीठाने कर वादातील एका प्रकरणात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या बाजूने निकाल दिला आहे. आयटीएटीने 2012-13 च्या आर्थिक वर्षादरम्यान, सचिन तेंडुलकरच्या पुण्यातील फ्लॅटवरील उत्पन्न शून्य असल्याचं नमूद केलं, यामुळे त्याला आता कोणताही कर भरावा लागणार नाही.

आयटीएटीने सचिनच्या पुण्यातील एका फ्लॅटमधून अंदाजे 1.3 लाखांचा कर न घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या निर्णयामुळे सचिनचे 1.3 लाख रुपये वाचले आहेत. 2012-13 या आर्थिक वर्षांत पुण्यातील फ्लॅटसाठी भाडेकरु मिळाला नव्हता, त्यामुळे भाड्यातून येणाऱ्या मिळकतीवर कर देण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद माजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरकडून करण्यात आला होता.

सचिनने म्हटलं होतं की, "एका फ्लॅटमधून मला दर महिन्याला 15 हजार रुपयांचं भाडं मिळतं. तर दुसऱ्या फ्लॅटसाठी भाडेकरु मिळाला नाही. त्यामुळे आयटी अॅक्ट 1961च्या कलम 23 (1) (सी) नुसार मला व्हेकन्सी अलाऊन्स मिळावा. "

जर संपूर्ण आर्थिक वर्षात एखादी संपत्ती रिकामी राहिली तर करदात्यांना व्हेकन्स अलाऊन्स नियमानुसार सूट दिली जाते. आयटी अॅक्ट अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त घरं असतील, तर तो दोन्हीपैकी एक फ्लॅट स्वत:ला राहण्यासाठी वापरुन कर वाचवू शकतो.

45 वर्षीय सचिन तेंडुलकरचे पुण्यात दोन फ्लॅट असून एक सॅफायर पार्क (60.6 लाख रुपये) आणि ट्रेजर पार्क (82.8 लाख रुपये) इथे आहे.

आयटीएटीने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं होतं की, तेंडुलकरने 2012-13 या आर्थिक वर्षात 61.23 कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती.