मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेट आणि फुटबॉलपाठोपाठ आता कबड्डीच्या व्यावसायिक लीगमध्ये दाखल झाला आहे. स्टार स्पोर्टसच्या प्रो कबड्डी लीगमधल्या चेन्नईस्थित फ्रँचाईझीमध्ये सचिननं गुंतवणूक केली आहे.
यंदाच्या मोसमापासून तो प्रो कबड्डी लीगच्या कोर्टवर तामिळनाडूच्या संघाचा को-ओनर म्हणून दिसेल. प्रो कबड्डी लीगमध्ये यंदाच्या मोसमात तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या चार संघांचा समावेश होणार आहे.
तामिळनाडू संघाचे हक्क इक्वेस्ट एन्टरप्राईझेस प्रायव्हेट लिमिटेडनं मिळवले आहेत. या कंपनीत सचिन तेंडुलकर आणि उद्योजक एन. प्रसाद यांची गुंतवणूक आहे.
सचिननं एक खेळाडू म्हणून आयपीएलला रामराम ठोकल्यानंतरही, मेन्टॉरच्या भूमिकेतून मुंबई इंडियन्सशी आपलं नातं कायम राखलं आहे. त्यानंतर इंडियन सुपर लीगमधल्या केरला ब्लास्टर्स संघातही को-ओनर म्हणून त्यानं गुंतवणूक केली आहे.