औरंगाबाद : पेट्रोल पंपधारकांनी येत्या 14 तारखेपासून केवळ एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा इशारा दिल्यानंतर आता प्रशासन आक्रमक झालं आहे. पेट्रोल पंपचालकांनी आपला संप मागे न घेतल्यास त्यांची लायसन्स रद्द करु, असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.
येत्या रविवारपासून पेट्रोलपंपांना रविवारी साप्ताहिक सुट्टी, तर सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच पेट्रोलपंप चालू राहतील अशी भूमिका घेतली आहे. त्यावर तोडगा काडण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पेट्रोलपंप व्यवयासिकांना आज चर्चैसाठी बोलावलं होतं. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.
राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी कमिशन वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 मे रोजी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोलपंप चालकांनी घेतला आहे. पेट्रोल वितरकांच्या ‘फामपेडा’ संघटनेच्या वतीने औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली होती.
मागण्या मान्य न झाल्यास येत्या रविवारपासून साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारपासून रात्रीच्या वेळी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती.
सध्या पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रति लीटर एक रुपया 45 पैसे एवढे कमिशन मिळते. या उलट पेट्रोल पंपाचा व्यवस्थापन खर्च सोयी-सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत कमी असल्याने व्यवसाय करणं कठीण जात असल्याचं पेट्रोलपंप चालकांचं म्हणणं आहे.
मागण्यांसदर्भात सरकारकडे पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचं संघटनेनं सांगितलं आहे.