रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला पदकानं अगदी थोड्या फरकानं हुलकावणी दिली. पण तिच्या या प्रयत्नाचं संपूर्ण देशानं कौतुक केलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही दीपाचं कौतुक करत तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


 

दीपा पदकाच्या जवळ पोहचली पण तिला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. कांस्य पदक जिंकणाऱ्या गिलिया स्टेनग्रुबरपेक्षा अवघ्या 0.150 गुणांनी ती मागे पडली.

 

ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचं प्रोत्साहन वाढविण्यासाठी रिओला गेलेल्या तेंडुलकरनं त्रिपुराच्या दीपाचं ट्विटरवरुन कौतुक केलं आहे.

 

'जिंकणं आणि हरणं हा खेळाचा भाग आहे. पण तू लाखो लोकांचं हृदय जिंकलं आहेस आणि संपूर्ण देशाला तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे.' असं ट्वीट करुन सचिननं तिचं कौतुक केलं.

 


 

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अभिनव ब्रिंदानंही ट्विटरवरुन दीपाचं कौतुक केलं आहे. 'दीपा कर्माकर तू माझी हिरो आहेस!'

 



बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवरुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'दीपा कर्माकर... भारताचा गौरव... तुझी कहाणी आम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. खूप खूप शुभेच्छा!  

 


संबंधित बातम्या:

खेलग्राममध्ये गेल्यावर दीपा ढसाढसा रडली: कोच