मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही टीम इंडियाची एकेकाळची आक्रमक सलामीवीरांची जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. निमित्त आहे पुढील वर्षी भारतात होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेचं.
4 ते 16 फेब्रुवारीदरम्यान या भारतात रोड सेफ्टी वर्ल्ड ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेची अधिकृत घोषणा आज मुंबईत करण्यात आली. यावेळी पाचही संघांचे कर्णधार, स्पर्धेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवागच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभंकर आणि ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं.
या स्पर्धेत भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या पाच संघांचा समावेश आहे. या संघांमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले 75 हून अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
भारतातल्या पुणे आणि मुंबई या दोन महत्वाच्या शहरांमध्ये स्पर्धेच्या पहिल्याच मोसमातील सामने खेळवण्यात येणार आहेत. सहभागी पाच संघांपैकी भारताचं नेतृत्व सचिन तेंडुलकरकडे, वेस्ट इंडिजची धुरा ब्रायन लाराकडे, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ब्रेट लीकडे, तर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व अनुक्रमे तिलकरत्ने दिलशान आणि जॉन्टी ऱ्होड्सकडे सोपवण्यात आलं आहे.
13 दिवस चालणारी ही स्पर्धा राऊंड रॉबीन पद्धतीनं खेळवली जाणार आहे. सहभागी पाच संघांना एकमेकांविरुद्ध खेळावं लागेल. त्यातील अव्वल दोन संघांमध्ये 16 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळवण्यात येईल.
देशात सामाजिक बदल घडवून आणणं आणि रस्ते सुरक्षेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलणं हे या रोड सेफ्टी वर्ल्ड ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेचा उद्दीष्ट आहे. त्यासाठी हे व्यासपीठ महत्वाचं ठरणार असल्याचं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केलं.
सचिन-सेहवाग भारतासाठी पुन्हा सलामीला उतरणार!
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
17 Oct 2019 09:16 PM (IST)
13 दिवस चालणारी ही स्पर्धा राऊंड रॉबीन पद्धतीनं खेळवली जाणार आहे. सहभागी पाच संघांना एकमेकांविरुद्ध खेळावं लागेल. त्यातील अव्वल दोन संघांमध्ये 16 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळवण्यात येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -