यवतमाळ : मला राहुल गांधी यांना भेटायचे होते मात्र काँग्रेस नेत्यांनी भेट होऊ दिली नाही, असा आरोप कलावती बांदूरकर यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी कलावती यांच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर एका संस्थेच्या माध्यमातून कलावती यांना तब्बल 30 लाखांची मदत मिळवून दिली होती. तेव्हा कलावती प्रकाशझोतात आल्या होत्या.


वणी येथे झालेल्या राहुल गांधी यांच्यासभेत आज कलावती बांदूरकर ह्या देखील उपस्थित होत्या. राहुल गांधी यांची भेट घेण्याची त्यांची इच्छा होती. काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून भेटण्यासाठी निरोपही पाठवला होता. मात्र, काही नेत्यांनी भेट होऊ दिली नाही असा आरोप कलावती यांनी केला आहे. पोलिसांकडूनही सुरक्षा पास मिळवून राहुल गांधी यांना भेटण्याचे प्रयत्न केले होते, मात्र ते ही शक्य झाले नसल्याचं त्या म्हणाल्या.

राहुल गांधींना शेतकऱ्यांच्या समस्या, पिकांना हमी भाव, शेतकरी विधवा पेन्शन अशा मुद्द्यांवर काही बोलायचे होते असे कलावती यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांनी 2008 मध्ये मदत करताना दोन्ही मुलांना दत्तक घेत त्यांच्या नोकरीची जबाबदारी घेण्याचे म्हटले होते. माझ्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र दुसऱ्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले असून आता राहुल गांधी यांनी नोकरी लावून द्यावी अशी मागणी ही कलावती यांनी केली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी काहीच केले नाही असा आरोपही कलावतीने केला आहे. विशेष म्हणजे कलावती यांचे 'जळका' गाव हे राहुल गांधींनी सभा झालेल्या वणी मतदारसंघातच आहे.

कलावती बांदूरकर या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने 2005 मध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. तर 2008 मध्ये त्यांची राहुल गांधींनी भेट घेतली होती.  त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.