आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा संकल्पनाधीष्ठीत आहे. पहिली ते चौथी या स्तरावर विविध संकल्पना निश्चित करुन त्यांच्याभोवती सर्व विषयांची गुंफण केलेली आहे. त्यामुळे कोणताही विषय चौथीपर्यंत स्वतंत्र नसल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. यामध्ये पुढे स्पष्टीकरण देताना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संकल्पनाधारित अभ्यासक्रम तयार करण्यामागे एक वेगळी भूमिका आहे.
इतिहासाची पार्श्वभूमी तयार करताना समाज निर्मिती, शासन-प्रशासन, राज्य आणि राज्यकर्ते या संकल्पना सर्वप्रथम स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर इयत्ता पाचवीपासून स्वतंत्र इतिहास विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी इयत्ता पाचवीमध्ये महाराष्ट्रातील सातवाहन, वाकाटक, चालुक्य अशी प्राचीन आणि शिलाहार, राष्ट्रकूट, यादव अशी मध्ययुगीन राजघराणी यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी देण्यात आलेली आहे.
अभ्यासक्रमात इयत्ता चौथीमध्ये जितका उल्लेख आहे, तो आहेच. त्या शिवाय इयत्ता सहावीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका वेगळ्या अंगाने देण्याचे मंडळाने ठरविले आहे. यानुसार शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्यासाठी केलेल्या संघर्षाबरोबरच त्यांची आदर्श प्रशासन व्यवस्था जी आजच्या काळातही अतिशय उपयुक्त आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर शिवचरित्रातील प्रेरणादायी पैलूही सहावीच्या पाठ्यपुस्तकातून उलगडण्यात येतील.
महाराष्ट्रातील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील राजसत्ता, छत्रपती शिवरायांचे कार्य, त्यांचे प्रशासन, तत्वे, नीती आणि शिवचरित्र आजही आदर्श का आहे? याबाबतचा विचार यांची ओळख इयत्ता सहावीमध्ये स्वतंत्रपणे करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा घाट मंडळाकडून घातला गेला हे अत्यंत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.