मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात इशांत शर्माने भेदक मारा करत पाच विकेट्स मिळवल्या. या कामगिरीबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरद्वारे इशांत शर्माचं कौतुक केलं आहे.


‘इशांत शर्माची दमदार कामगिरी. लॉर्ड्सवर 2014 साली झालेल्या सामन्याच्या आठवणी ताज्या झाल्या,’ असं ट्वीट करत सचिनने इशांत शर्माच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.


दरम्यान, भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाला अवघ्या 180 धावांत रोखण्यात यश मिळवलं. पहिल्या डावात इंग्लंडने भारतावर 13 धावांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात 194 धावांची आवश्यकता आहे.

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची स्थितीही नाजूक आहे. अजूनही भारताला 73 धावांची गरज असून भारताच्या चार विकेट्स हातात आहेत (शेवटचे अपडेट्स : 4 वाजता). त्यामुळे आता भारताची संपूर्ण मदार मैदानात अजूनही पाय रोवून उभ्या असलेल्या विराट कोहलीवर आहे.

सचिन तेंडुलकरने इशांतचे कौतुक करताना 2014 च्या लॉर्ड्स कसोटीची आठवण झाल्याचं म्हटलं आहे. या कसोटीत भारताने इंग्लंडवर 95 धावांनी विजय मिळवला होता. इशांत शर्माला या कसोटीतील पहिल्या डावात एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण दुसऱ्या डावात इशांतने आपल्या गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना पळता भुई थोडी करत सात विकेट्स मिळवल्या होत्या.