IPL 2020 | आयपीएल 2020 मध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना रंगणार आहे. पण सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या बंगलोर संघाला एक धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू ख्रिस मॉरिससुद्धा या सामन्यातही खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे ख्रिस मॉरिस सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता.


मॉरिस फिट नसल्याची माहिती आरसीबीने दिली आहे. आरसीबी संघाचे डायरेक्टर माईक हेसन म्हणाले की, मॉरिसला स्ट्रेन संबंधीची समस्या आहे. तो दुसर्‍या सामन्यातही खेळू शकणार नाही. मॉरिस गोलंदाजीत आणि अखेरच्या ओव्हर्समध्ये मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. मॉरिस संघात नसल्यामुळे आरसीबीच्या संघाचा बॅलेन्स बिघडला आहे. मॉरिस गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान देणारा खेळाडू आहे. त्यामुळे त्याची उणीव आरसीबीला नक्कीच जाणवेल.


दोन सामन्यात मॉरिस खेळू शकला नाही तरी पुढील सामन्यात तो संघात असेल, असा विश्वास माईक हेसन यांनी व्यक्त केला. मॉरिसला आरसीबीने 10 कोटी रुपये खर्चून संघात समाविष्ट करुन घेतलं आहे. या सीजनमध्ये मॉरिस आरसीबीसाठी महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.


मागील वर्षी अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या आरसीबीने या सीजनची सुरुवात चांगली केली आहे. आयपीएल 13 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला आरसीबीने 10 धावांनी पराभूत करुन विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात देवदत्त पड्डिकल, अॅरोन फिंच, एबी डी विलियर्सची फलंदाजी आणि चहलच्या शानदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.