हेडिंग्ले (इंग्लंड) : क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार असं म्हटलं तर आपल्याला सर्वात पहिलं नाव आठवतं ते म्हणजे सिक्सर किंग युवराज सिंहचं. पण युवराजच्या याच विक्रमाशी रविवारी एका धडाकेबाज फलंदाजानं बरोबरी केली आहे.


रविवारी नेटवेस्ट टी20 ब्लास्टमधील वॉर्केस्टरशायर आणि यॉर्कशायर यांच्यातील सामन्यात वूस्टरशायरचा फलंदाज रॉस व्हाइटलीने 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. क्रिकेट जगतात अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे.

या विक्रमानंतर बोलताना रॉस म्हणाला की, 'या सामन्यात मोठे फटके खेळण्यासाठी माझ्यासाठी चांगली संधी होती. एक तर सिक्स जाणार होता किंवा मी बाद झालो असतो. पण गोलंदाजाचं नशीब खराब होतं. लेग साइडला मैदान छोटं असल्याचा मी पुरेपूर फायदा घेतला.'

'मोठे फटके खेळायचे असा मी पहिल्यांदाच विचार केला होता. पण मी कधीही विचार केला नव्हता की, मी 6 चेंडूत 6 षटकार ठोकेन.' असंही रॉस म्हणाला.


रॉसनं 26 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी केली. पण तरीही त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यॉर्कशायरनं 20 षटकात 234 धावांचा डोंगर रचला होता. त्याचा पाठलाग करताना वूस्टरशायर 20 षटकात 196 धावाच करु शकलं. त्यामुळे यॉर्कशायरनं 37 धावांनी विजय मिळवला.