अमरावती : महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य माणसाला नेहमीच बसतो. पण अमरावती जिल्ह्यात महावितरणच्या याच गलथान कारभारामुळे एका शेतमजूराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतात घाम गाळून पोट भरणाऱ्या महादेव पाटील यांच्या घरातील वीजबिल चक्क 20 हजार रुपये आल्याने पाटील यांनी रविवार (दि. 23 जुलै रोजी) विष पिऊन आत्महत्या केली.

वास्तविक, महादेव पाटील यांच्या कौलारु घरात कामापुरते दोन लाईट आहेत. मात्र गेल्या 4-5 महीन्यांपासून सतत 10 हजारापेक्षा जास्त वीजबिल येत होते. जानेवारी महिन्यात तर चक्क त्यांना 20 हजाराचे वीजबिल आले. या प्रकारामुळे पाटील नेहमी चिडचिड होत होती.

वाढीव वीजबिलामुळे नौराश्येने ग्रासलेल्या पाटील यांनी 23 जुलै रोजी स्वत:ला संपवल्याचं कुटुंबीयाचं म्हणण आहे. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. आत्महत्येचा अन् वाढीव बिलाचा काहीही संबध नसल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

भारनियमनमुक्त महाराष्ट्र मोहीमेअंतर्गत राज्यातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना  वाढीव वीजबिल पाठवल्याचं प्रकरण नुकतच समोर आलं होतं. लातुरच्या परिमंडळ कार्यालायातील वाणिज्य शाखेचे माजी ज्युनिअर मॅनेजर दिवाकर उरणे यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं.

या प्रकरणाची दखल घेऊन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणकडून वाढीव बिल पाठवलं असेल, तर ते आम्ही परत करु, असं अश्वासन दिलं होतं. पण याच वाढीव बिलामुळे एका शेतमजूराला आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या

विजेचं वाढीव बिल पाठवलं असेल, तर ते आम्ही परत करु : ऊर्जामंत्री


भारनियमनमुक्त महाराष्ट्रासाठी 33 लाख शेतकऱ्यांच्या नावे वाढीव बिलं