सोची : पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने रशियातल्या फिफा विश्वचषकात पहिली हॅटट्रिक साजरी केली. रोनाल्डोच्या या हॅटट्रिकच्या जोरावरच पोर्तुगालने फिफा विश्वचषकाच्या ग्रुप बीमधील सामन्यात स्पेनला 3-3 असं बरोबरीत रोखलं. पोर्तुगाल आणि स्पेन संघांमधल्या या सामन्यात क्रीडारसिकांना फुटबॉलचा निखळ आनंद मिळवून दिला.
रोनाल्डोचा पहिला गोल
फिश्ट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पुर्तगालने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला स्पेनचा डिफेंडर नॅचोने रोनाल्डोला बॉक्समध्ये पाडलं, ज्यामुळे पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. रोनाल्डोने ही संधी वाया घालवली नाही आणि गोल करुन आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.
पोर्तुगालला 22 व्या मिनिटात आपली आघाडी वाढवण्याची संधी मिळाली, पण कर्णधार रोनाल्डोकडून मिळालेल्या पासवर गोल करण्यास फॉरवर्ड गोनकालो गुएडेसला अपयश आलं. यानंतर दोन मिनिटांनी स्पेनचा स्ट्रायकर डिएगो कोस्टाने पोर्तुगालचा डिफेन्स भेदून गोल केला आणि सामन्यात बरोबरी केली.
स्पेनचा आक्रमक खेळ
बरोबरी केल्यानंतर स्पेनचा खेळ आणखी चांगला झाला. पहिला हाफ 1-1 वर बरोबरीत संपला. पण रोनाल्डोने 44व्या मिनिटाला गोल केल्याने पोर्तुगालला सामन्यात 2-1 ने आघाडी मिळाली.
मात्र दुसऱ्या हाफमध्ये स्पेनचा संघ अधिकआक्रमकतेने खेळला. 55व्या मिनिटाला स्पेनला फ्री किक मिळाली. त्याचा पुरेपुर फायदा घेत डिएगो कोस्टाने गोल करुन पुन्हा एकदा संघाला बरोबरीत आणलं.
यानंतर तीनच मिनिटांनी डिफेंडर नॅचो फर्नांडिसने आपल्या संघासाठी गोल डागत स्पेनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. स्पेनने ती आघाडी तीस मिनिटं टिकवली. मात्र अखेर सामना संपायला दोन मिनिटं असताना म्हणजेच 88 व्या मिनिटाला रोनाल्डोने फ्री किकवर मारलेल्या जादुई गोलने पोर्तुगालला बरोबरी साधून दिली.
कोणत्या मिनिटाला गोल?
रोनाल्डोने सामन्याच्या चौथ्या आणि 44व्या मिनिटाला पोर्तुगालचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा गोल मारला.
त्यानंतर डिएगो कोस्टाने अनुक्रमे 24व्या आणि 55व्या मिनिटाला गोल नोंदवून स्पेनला बरोबरी साधून दिली होती.
मग नॅचो फर्नांडिसने 58 व्या मिनिटाला गोल करुन स्पेनला आघाडी मिळवून दिली.
अखेर 88 व्या मिनिटाला रोनाल्डोने तिसरा गोल करुन सामना बरोबरीत संपवलाच, पण हॅटट्रिकही साजरी केली.