सांगली : ‘मिसेस इंडिया’च्या किताबावर सांगलीच्या वैशाली पवारने नाव कोरलं आहे. मिसेस वर्ल्ड स्पर्धेसाठी आता वैशालीची निवड झाली आहे.

दिल्लीतील ‘किंग्डम ऑफ ड्रीम्स’मध्ये चार दिवस 'मिसेस इंडिया' ही स्पर्धा रंगली होती. वैशाली ही मूळची सांगलीकर असून कर्नाटकातील बंगळुरु हे तिचं सासर आहे.

'मिसेस इंडिया'च्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी विविध फेर्‍यांमध्ये तिने चुणूक दाखवली. या स्पर्धेच्या मुलाखतीमध्ये प्रेक्षणीय वारसा स्थळांच्या संरक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनावर विशेष भर आवश्यक असल्याचे तिने सांगितले. यामध्ये तिला सर्वाधिक गुण मिळाले.

2016 मध्ये 'मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' या सौंदर्य स्पर्धेचा मुकूट वैशालीने पटकवला होता. 'मिसेस इंडिया वर्ल्डवाईड' मध्येही वैशालीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.



वैशालीने सांगलीतील बापट बालविद्यामंदिरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं, तर  ग. रा. पुरोहितमध्ये माध्यमिक आणि कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. वैशालीने मुंबईतील व्हीजेटीआयतून पदव्युत्तर पदवी तर अमेरिकेत जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठात प्रकल्प व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलं.

सध्या बंगळुरुत 'सिस्को' या आंतरराष्ट्रीय कंपनीत ती सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. वैशाली ही सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे. सध्या नऊ स्वयंसेवी संस्थांबरोबर शासकीय शाळा, स्थलांतरित मुलं, अनाथाश्रम, पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण, रक्त संकलन अशा उपक्रमात तिचा सहभाग आहे.

शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये तिने शंभरहून अधिक बक्षिसं पटकवली आहेत. वैशालीने क्रीडाक्षेत्रात वैयक्तिक आणि सांघिक खेळात 28 ट्रॉफी आणि पदकं मिळवली. तिला मॉडेलिंगचीही आवड आहे.

सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या कसोटीवर वैशालीने स्वत:ला सिद्ध करत मिसेस इंडियाचा मानाचा किताब पटकावला. वैशालीचे डेनिम, बूट्स, हुबलॉत सारख्या आंतरराष्ट्रीय आणि ज्यूवेल्स ऑफ इंडिया, म्हैसूर सिल्क सारख्या राष्ट्रीय ब्रॅन्डेड कंपन्यांसोबत जाहिरातीचे करार आहेत.

स्पर्धेत निवड झाल्यानंतर वैशालीला लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या होत्या. नुकतीच ती माहेरी सांगलीला आली असता तिचं मोठ्या उत्साहात तिच्या कुटुंबाने स्वागत केलं.