कोलंबो : रोहित शर्माच्या टीम इंडियानं बांगलादेशचा 17 धावांनी पराभव करून कोलंबोतल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयाचा शिल्पकार फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर हा ठरला.


या सामन्यात भारतानं बांगलादेशला विजयासाठी १७७ धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला वीस षटकांत 159 धावांतच रोखलं. भारताकडून ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने सर्वात प्रभावी मारा केला. त्यानं २२ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लानं नाणेफेक जिंकून, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 176 धावांपर्यंत मजल मारली.

दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला या सामन्यात सूर गवसला. त्याने 61 चेंडूत 89 धावा केल्या. तर रैनानेही झटपट 47 धावा करुन त्याला चांगली साथ दिली. बांगलादेशकडून फक्त रुबल हुसेननं दोन फलंदाजांना बाद केलं. तर इतर गोलंदाजांना एकाही फलंदाजाला बाद करता आलं नाही.
आहे.