रो'हिट' मॅन...! मास्टर ब्लास्टर सचिनचा 'तो' विक्रम रोहित शर्मा मोडणार?
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2019 07:15 AM (IST)
रोहित शर्मानं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संगकाराच्या त्या विक्रमाची बरोबरी साधली. कुमार संगकारानं 2015 सालच्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माचं हे चौथं आणि वन डे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं सव्विसावं शतक ठरलं.
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात ठोकलेल्या शतकानं रोहितने एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतकं करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. एकाच विश्वचषकात सर्वाधिक चार शतकं झळकावण्याचा विक्रम आजवर श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. या विक्रमाशी रोहितने बरोबरी केली. रोहित शर्मानं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संगकाराच्या त्या विक्रमाची बरोबरी साधली. कुमार संगकारानं 2015 सालच्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माचं हे चौथं आणि वन डे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं सव्विसावं शतक ठरलं. दरम्यान आता रोहित मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. विश्वचषकातल्या सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर विश्वचषकात सहा शतकं आहेत. टीम इंडियाचा अजून एक साखळी सामना बाकी आहे. सोबतच बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत टीम इंडियाने सेमी फायनलचं तिकीट देखील फिक्स केलं आहे. त्यामुळे रोहितला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.