मुंबई : बीसीसीआयकडून घेतल्या जाणाऱ्या यो यो या फिटनेस टेस्टमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा अडकला आहे. या टेस्टमध्ये पास होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला 16.1 गुण मिळवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याचं संघातील स्थान धोक्यात आहे.
यो- यो टेस्टमध्ये बहुतांश मोठे खेळाडू पास झाले. मात्र या टेस्टमध्ये नापास झाल्याने अंबाती रायुडूला वन डे संघातून, तर संजू सॅमसनला ‘इंडिया ए’ संघातून आपलं स्थान गमवावं लागलं. रायुडूच्या जागी रैनाला संधी देण्यात आली आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यानंतर बंगळुरुत सर्व खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली. मात्र वैयक्तिक कारणांमुळे रोहितची ही टेस्ट नंतर घेण्यात आली. मात्र त्यामध्ये तो अपयशी ठरला. आता आज (मंगळवारी) होणाऱ्या टेस्टवर त्याचा संघातील समावेश अवलंबून आहे.
... तर रोहितच्या जागी रहाणेला संधी?
मंगळवारी होणाऱ्या टेस्टमध्येही रोहित नापास झाल्यास त्याच्या जागी अजिंक्य रहाणेची संघात वर्णी लागू शकते. रहाणेला इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र रोहितचं फिटनेस टेस्टमधील अपयश रहाणेच्या पथ्थ्यावर पडू शकतं.
आता अगोदर फिटनेस टेस्ट, मगच निवड
खेळाडूंची निवड केल्यानंतर त्यातील खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये अपयशी झाल्याने बीसीसीआयची अडचण होते. अशावेळी एखाद्या नवीन खेळाडूला संघात घ्यावं लागतं. हे सर्व टाळण्यासाठी निवडीआधी यो यो टेस्ट घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीअगोदर घेतलेल्या यो यो टेस्टमध्ये मोहम्मद शमी अपयशी झाल्याने त्याच्या जागी युवा खेळाडू नवदीप सैनीला संधी देण्यात आली होती.
रोहित शर्मा यो यो टेस्टमध्ये अडकला, रहाणेला संधी मिळणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jun 2018 06:30 PM (IST)
या टेस्टमध्ये पास होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला 16.1 गुण मिळवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे रोहितचं संघातील स्थान धोक्यात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -