मुंबई : येत्या 23 जूनपासून तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसली तर तुम्हाला तब्बल 5000 चा दंड भरावा लागणार आहे. कारण येत्या  23 जूनपासून महाराष्ट्रभरात प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरु होईल. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांसोबतच वन टाईम युज प्लास्टिक म्हणजेच ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर  कारवाई होणार आहे.


मुंबई शहर आणि उपनगरांत प्लास्टिकमुळे होणारा वाढता कचरा आणि प्रदूषण पाहता बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या मुंबईकरांविरोधात महापालिका कठोर कारवाई करणार आहे. यामध्ये सर्व दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल यांचा समावेश असेल. या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसंच, जर सर्वसामान्य जनतेच्या हातात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर त्यांनाही 5000 पर्यंतचा दंड करण्याची तरतूद आहे.

मात्र,सर्वसामान्यांसाठीचा हा दंड 200 रुपयांपर्यंत कमी करण्यात यावा असा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीत मांडला जाईल. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतरच सर्वसामान्यांसाठी असलेल्या दंडाची रक्कम निश्चित होऊ शकेल.

- फेरीवाले, दुकानदार, बाजार भागांमध्ये कारवाई करण्यासाठी 249 निरीक्षकांची नेमणूक

- ज्या प्लास्टिकच्या वस्तूचा वापर दीर्घकाळ केला जाऊ शकतो अशा प्लास्टिकसाठी दंड नाही

- यासोबतच थर्माकॉलवरही बंदी असणार, यासाठीही दंड आकारला जाणार

- गणेशोत्सवात थर्माकॉलच्या सजावटींसाठी आणि थर्माकॉलच्या मखरांसाठीही दंड

कोणत्या वस्तूंवर कारवाई होणार?
सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, चहाचे कप, सरबत ग्लास, थर्माकॉल प्लेट, थर्माकॉल ग्लास, डोकोरेशनसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल

कोणत्या वस्तूंवर कारवाई नाही?
दीर्घकाळ वापरता येणारे प्लास्टिक, उत्पादित कंपन्यांकडून पॅकिंगसाठी वापरले जाणारे थर्माकॉल, हॉस्पिटलमधील प्लास्टिकची उपकरणं, सलाईन बॉटल, पेन, प्लास्टिकचे डबे