मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 10व्या मौसमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात आचारसंहिता भंग केल्यानं सक्त ताकीद देण्यात आली आहे.

रोहित शर्मानं आचारसंहिता भंग केल्यानं मॅच रेफरीनं त्याला इशारा दिला आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात रोहितला चुकीचं बाद देण्यात आलं. यावेळी पंचच्या या निर्णयावर रोहित शर्मा मैदानातच प्रचंड चिडला.

एका पत्रकातून स्पष्ट करण्यात आलं की, खेळाडू आणि संघ व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेली आयपीएलच्या आचारसंहितेतील 2.1.5 नियमाचं उल्लंघन केलं आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यानं मॅच रेफरीनं रोहित शर्मा सध्या तरी फक्त इशाराच दिला आहे.

गेल्या दोन सामन्यात कर्णधार रोहित शर्माची आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी झालेली नाही. कालच्या सामन्यात दहाव्या षटकात सुनील नरेनने रोहित शर्मा पायचीत बाद असल्याची अपील केली. त्यावेळी अंपायर सी के नंदन यांनीही तातडीने त्याला आऊट दिलं.

मात्र चेंडू पायावर आदळण्यापूर्वी बॅटला लागल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. त्यामुळेच रोहित शर्मा अंपायरवर खूपच संतापला.

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं वानखेडेवरच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर चार विकेट्सनी थरारक विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. पण हार्दिक पंड्यानं कमाल केली. त्यानं हरभजनसिंगच्या साथीनं मुंबईला एक चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवून दिला. मुंबईने कोलकात्याचं 179 धावांचं आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: अंपायरचा चुकीचा निर्णय, रोहित शर्मा वैतागला