मुंबई : नोटाबंदीनंतर जाणवलेला चलनकल्लोळ पुन्हा एकदा दिसत आहे. कारण मुंबई, नवी मुंबई, पुणे यांसह राज्यभरातील अनेक एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुंबईत सकाळपासूनच अनेक एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे सकाळी सकाळी मुंबईकरांना एटीएमची शोधाशोध करावी लागली. रविवारची सुट्टी आल्यामुळे अशी परिस्थिती झाली असावी, असं बोललं जात आहे.
मुंबईप्रमाणेच राज्यभरातही अशीच परिस्थिती आहे. जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकांना एटीएममध्ये पैसे नसल्याने बँकेच्या रांगेत उभं राहून पैसे काढावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अभूतपूर्व चलनकल्लोळ निर्माण झाला होता. त्यानंतर ही परिस्थिती आटोक्यात आली होती. एटीएममध्ये सहजपणे पैसे उपलब्ध होत होते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक एटीएममध्ये खडखडाट दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातही एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या आठवड्याच्या सुरुवातीलाच चलनकल्लोळ निर्माण झाला आहे.