मुंबई : इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला मात्र संघात स्थान दिलं गेलं नाही. यावर आता रोहितने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘सूर्य पुन्हा उगवेल,’ असं ट्वीट करत रोहितने भविष्यात आपण कसोटी संघात स्थान मिळवण्याबाबत आशावादी असल्याचं  सुचवलं आहे.

वनडे आणि टी-ट्वेण्टीत आपल्या फलंदाजीची छाप पाडणाऱ्या रोहितला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच मागील पाच वर्षांपासून कसोटी संघात तो आतबाहेर होत आहे.

रोहितने आतापर्यंत खेळलेल्या 25 कसोटी सामन्यांत 1479 धावा केल्या आहेत. रोहितची ही कामगिरी त्याच्या लौकिकास साजेशी नाही. त्यामुळेच त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी अजून मेहनत घेण्याची गरज आहे.

दरम्यान, विकेटकीपर वृद्धिमान साहादेखील जखमी असल्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. साहाच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे, फलंदाज वृषभ पंतला कसोटी संघात पहिल्यांदाच स्थान देण्यात आलं आहे. पंतने आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती.