मुंबई : स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने उद्या (20 जुलै) एकदिवसीय बंद जाहीर केला आहे. विविध मागण्यांसाठी हा बंद असेल. त्यामुळे स्कूल बस, खासगी बस, ट्रक, टेम्पो, प्रायव्हेट कॅब बंद राहतील.


शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस चालू ठेवाव्यात, असेही असोसिएशनने म्हटले आहे. तसेच, एकदिवसीय संपाचा निर्णय उशिरा कळवत असलो, तरी आमच्याकडे संपाशिवाय कुठलाच पर्याय नव्हता, असेही असोसिएशनचे म्हटले आहे.

कुठली वाहनं संपात सहभागी असतील?

स्कूल बस, लक्झरी बस, ट्रक, टेम्पो, खासगी कॅब, टुरिस्ट कार इत्यादी वाहनं ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या या संपात सहभागी असतील.

मागण्या काय आहेत?

  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअंतर्गत आणाव्यात, जेणेकरुन किंमती कमी होतील.

  • इंधनांचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत.

  • स्कूल बसच्या चेसिसचे एक्साईज ड्युटी माफ करावी.

  • मुंबईतल्या सर्व टोल नाक्यांवर स्कूल बसना टोलमाफी द्यावी.

  • महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यांवर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा.

  • विमा हफ्त्यात कपात करावी.

  • आरटीओकडून होणारी वार्षिक तपासणी बंद करावी आणि बस स्कूल बस सेफ्ट कमिटीकडून तपासणी करावी.

  • शाळेभोवती पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी.

  • रस्ते खड्डेमुक्त करावे.