मुंबई : उत्तम नेतृत्त्व आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावर रोहित शर्माने भारताला आशिया चषक 2018 मिळवून दिला. तरीही वेस्ट इंडीजविरुद्ध पुढील महिन्यापासून होणाऱ्या कसोटी मालिकेत संधी न दिल्याने चाहत्यांसह हरभजन सिंह नाराज आहे. निवडकर्त्यांवर नाराजी व्यक्त करण्यासाठी रोहितच्या चाहत्यांनी आधीपासूनच सोशल मीडियाचा आधार घेतला, आता हरभजननेही यावर ट्वीट केलं आहे.

"वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्माचं नाव नाही. अखेर निवडकर्ते काय विचार करत आहेत? कोणाला काही कल्पना आहे का? जर कोणाला समजलं तर मला सांगा, कारण ही बाब माझ्या पचनीच पडत नाही," असं ट्वीट हरभजनने बीसीसीआयच्या निर्णयावर केलं आहे.


याशिवाय रोहित शर्माचे चाहतेही निवडकर्त्यांवर टीका करत आहे. काहींनी चेतेश्वर पुजारा आणि केएल राहुल यांच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारत मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 3 ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील महिला सामना 4 ते 8 ऑक्टोबरदरम्यान राजकोटमध्ये आणि दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ 21 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिकेत भिडणार आहेत. वनडे सीरिजचा पहिला सामना 21 ऑक्टोबरला गुवाहाटी, दुसरा 24 ऑक्टोबरला इंदूर, तिसरा 27 ऑक्टोबरला पुणे, चौथा 29 ऑक्टोबरला मुंबई आणि पाचवा 1 नोव्हेंबरला थिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर