मावळ लोकसभा मतदारसंघातून पवारांची तिसरी पिढी राजकारणात उतरण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2018 07:55 AM (IST)
मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे असल्याची सूत्रांची माहिती आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे.
मुंबई : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार उतरण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे असल्याची सूत्रांची माहिती आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. श्रीरंग बारणे हे मावळचे खासदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदार संघ आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. बारणेंना 5 लाख 12 हजार 223 मतं मिळाली होती. तर दुसऱ्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाच्या लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 मतं मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर तिसऱ्या स्थानावर होते. नार्वेकरांना 1 लाख 82 हजार 293 मतं मिळाली होती. मागील जिल्हापरिषद निवडणुकीपासून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. रोहित पवार यांच्या जोडीला पार्थ पवार यांना राजकारणात आणून राष्ट्रवादी राज्यातील तरुणांचे मोठी संघटना निर्माण करण्याची करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार यांनी यापूर्वीही आजोबांसोबत (शरद पवार) विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. शिवाय त्यांनी नागपुरात विधीमंडळाचं कामकाज पाहण्यासाठीही हजेरी लावली होती. संबंधित बातम्या :