मुंबई : सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, अशी मागणी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे. मधल्या काळात सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद झाल्या. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. सिंचनाची अवस्था विदर्भ मराठवाड्यात खराबच आहे. मराठवाडा विदर्भात सिंचनाचा अनुशेष कमी झालेला नाही. माझ्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात किमान आठ ते नऊ प्रकल्पाची सुप्रमा भेटलेली नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

त्यासोबतच पुढचे सहा महिने मंत्री, आमदार, आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता गमावल्याचाही उल्लेखही बच्चू कडू यांनी केला आहे.

कालच विधानसभा अध्यक्षांची निवड व्हायला हवी होती. भाजप आणि शिवसेनेची मैत्री गेली 25 वर्षांची आहे. मैत्रीची नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवं होतं. पुन्हा भाजप शिवसेनेची युती होऊ शकते. मात्र कालचा क्षण पुन्हा येणार नाही. काल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन न करून भाजपने नैतिकता गमावली आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन करतो. शेतकऱ्याचा मुलगा विधानसभा अध्यक्ष झालाय ही आनंदाची गोष्ट असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, सभागृहात बोलताना बच्चू कडू यांनी अपक्ष आमदारांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याबाबत देखील मुद्दा मांडला. प्रमुख पक्षांच्या सदस्यांना जास्त वेळ दिला जातो आणि ज्यावेळी आमच्याकडे वेळ येते त्याचवेळी कमी का होतो? असा सवाल त्यांनी अध्यक्षांना केला. हा सर्व अपक्ष सदस्यांचा मुद्दा आहे. हे गेले 15 वर्ष माझ्यासोबत होत आहे, असे देखील ते म्हणाले.