बर्न : स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडररनं रिओ ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. 2016 च्या मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये आपण खेळू शकणार नसल्याचं फेडररनं जाहीर केलं आहे. फेडररनं काही महिन्यांपूर्वीच शस्त्रक्रिया करुन घेतली होती. फेडररची गुडघेदुखी बळावली असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
प्रदीर्घ करिअरच्या दृष्टीने ही 17 वेळा ग्रँड स्लॅम पटकवणाऱ्या विश्रांती गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. 34 वर्षांच्या फेडररला फेब्रुवारी महिन्यात गुडघेदुखीने ग्रासलं होतं. त्यानंतर मे महिन्यात पाठदुखीच्या त्रासामुळे त्याला फ्रेंच ओपनमधून माघार घ्यावी लागली होती.
रिओ ऑलिम्पिकमध्ये स्वित्झर्लंडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी न मिळणं त्रासदायक असल्याचं फेडररने त्याच्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे. 2017 मध्ये टेनिस स्पर्धांत नव्या उमेदीने आणि दुखण्यांना रामराम ठोकत खेळण्याचा माझा इरादा आहे, असंही तो म्हणतो.
2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये फेडररला दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. त्याला ऑलिम्पिक एकेरीचं जेतेपद पटकवण्यात अद्याप यश आलेलं नाही.