मुंबई : मुंबई लोकलने सांताक्रूझ स्टेशन सोडल्यानंतर विलेपार्ले येण्याआधी दरवळणारा ओळखीचा सुगंध आता अनुभवता येणार नाही. कारण जगविख्यात पारले-जी कंपनीने आपला विले-पारलेचा प्लान्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि प्लांटच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पारले बिस्किटांच्या त्या सुगंधाची सवय लागली आहे. मात्र जवळपास 87 वर्षांनी हा दरवळ थांबणार आहे. पारले स्टेशनवरुन नामकरण झालेल्या या ब्रँडकडून पारल्याच्या जागेला अलविदा केला जाणार आहे.

 
1929 साली याच ठिकाणाहून पारले उत्पादनांच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. सुरुवातीला फक्त गोळ्यांचं (कँडीज) उत्पादन व्हायचं. त्यानंतर दहा वर्षांनी बिस्किटांची निर्मिती सुरु झाली. त्यानंतर या बिस्किटांनी संपूर्ण जगाला वेड लावलं. निल्सनच्या सर्व्हेनुसार पारले-जी जगातलं सर्वाधिक विकलं जाणारं बिस्किट आहे. मात्र आता त्यांचा मुंबईस्थित प्लँट बंद होणार आहे.

 
या प्लांटमध्ये तीनशे कर्मचारी कार्यरत होते, त्या सर्वांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती आहे. 10 एकरावर पसरलेल्या या भागाचा 25 ते 28 हजार रुपये प्रति चौरस फूट दर असल्याचं रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार सांगतात. या प्लान्टमधून हव्या त्या प्रमाणात उत्पादन होत नसल्यानं हा प्लँट बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक अरुप चौहान यांनी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वीच इथल्या बिस्किट आणि गोळ्यांचं उत्पादन थांबवण्यात आलं. दरम्यान, इतर प्लँट सुरुच असल्याने ग्राहकांना त्यांच्या आवडत्या बिस्किटांची चव यापुढेही चाखता येणार आहे.

 
ब्रिटानिया आणि आयटीसी हे पारलेचे प्रमुख स्पर्धक आहेत. पारलेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार बिस्किट मार्केटमध्ये पारलेचा 40 टक्के वाटा आहे, तर भारतातील बेकरी उत्पादनांमध्ये 15 टक्के मार्केट शेअर आहे. पारले जी प्रमाणे मोनॅको, हाईड अँड सीक, क्रॅकजॅक, मिलानो यासारखी प्रसिद्ध बिस्किटं आहेत.