नॉटिंगहॅम : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाच विकेट घेत इंग्लंडच्या पहिल्या डावाचं कंबरडं मोडलं. पंड्याच्या पाच, इशांत शर्मा आणि बुमरा यांच्या प्रत्येकी दोन विकेटमुळे इंग्लंडचा पहिला डाव 161 धावांवर आटोपला. भारतीय संघाला 168 धावांची आघाडी मिळाली आहे.


आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ऋषभ पंतने मात्र या सामन्यात कमाल केली. त्याने यष्टिरक्षक म्हणून पाच झेल घेतले, जो एक विश्वविक्रम आहे. पदार्पणाच्या सामन्यात एकाच डावात पाच झेल घेणारा तो आशियातील पहिलाच यष्टिरक्षक ठरला आहे.

यापूर्वीही फलंदाजीमध्ये त्याने कमाल केली होती. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत खातं उघडणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर यष्टिरक्षण करतानाही त्याच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला.

ऋषभने दोन झेल इशांत शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर घेतले, तर एक झेल जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर घेतला.

पहिल्या डावाची सुरुवात इंग्लंडने चांगली केली. मात्र उपहारानंतर इंग्लंडची फलंदाजी ढासळली. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर इंग्लंडच्या फलंदाजांना तग धरता आला नाही.