पुणे : 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर ज्या दोन मारेकऱ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, त्यातील एक सचिन अंदुरे आहे. हा संपूर्ण कट अगोदरच अटकेत असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे याने रचला आहे. त्यामुळे सचिन अंदुरेची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असा अर्ज सीबीआयने कोर्टात केला.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरेची कोठडी मिळवण्यासाठी सीबीआयने सादर केलेल्या रिमांडमध्ये संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचं म्हटलंय.

सचिन अंदुरेला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सचिन अंदुरेला कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे 26 ऑगस्टपर्यंत अंदुरे सीबीआयच्या कोठडीत असेल.

सचिन अंदुरेला कशी अटक करण्यात आली?

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं आहे. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर) शरद कळसकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.

जालन्यातूनही एकाला अटक

या प्रकरणात जालना जिल्ह्यातूनही एकाला अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पांगारकर असं जालन्यात अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

सचिन अंदुरे कोण आहे?

सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता.  निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.