नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला गेल्यानंतर वादात सापडलेले पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू भारतात परतले आहेत. भारतात येताच त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत घेतलेल्या गळाभेटीचंही समर्थन केलं.

“मी परवानगी घेऊन पाकिस्तानमध्ये गेलो होतो. देशाचा कोणताही नियम तोडलेला नाही,” असा दावा सिद्धू यांनी एबीपी न्यूजशी बोलताना केला.


“कुणी तुम्हाला येऊन भेटत असेल आणि म्हणत असेल की आपण समान संस्कृतीशी एकबद्ध आहोत. आम्ही गुरु नानक यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने करतापूर बॉर्डर खुली ठेवू… असं ते म्हणत असतील तर मी काय करायला पाहिजे,” असं सिद्धू म्हणाले.

इस्लामाबादमध्ये शपथविधी सोहळ्यात सिद्धू यांना पाकव्याप्त काश्मीर (पीओके) ज्याला पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर असंही म्हटलं जातं, त्या भागाचे प्रमुख मसूद खान सिद्धू यांच्याशेजारी बसण्यासाठी जागा देण्यात आली. त्यावरही सिद्धू यांनी स्पष्टीकरण दिलं.


'मी तिथे एक सन्मानित अतिथी म्हणून आमंत्रित होतो आणि अशा वेळी तुम्हाला सांगितलं तिथे बसावं लागतं. मी अगोदर दुसरीकडे बसलो होतो, मात्र त्यांनी मला नंतर तिथे (मसूद खान) बसायला सांगितलं म्हणून बसलो,'' अशी माहिती सिद्धू यांनी दिली.


दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणं चुकीचं असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. आपले जवान दररोज शहीद होत आहेत हे अगोदर समजून घ्यायला हवं, असं म्हणत त्यांनी विरोध दर्शवला.

काय आहे वाद?

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. शिवाय पीओकेचे प्रमुख मसूद खान यांच्याशेजारी सिद्धू बसले होते. त्यामुळे भारतीयांच्या सिद्धू निशाण्यावर आले. भाजपसह इतर पक्षांनीही सिद्धूंवर निशाणा साधला आहे.