'वैसे तो ये चौकाही है' म्हटल्यानं रिषभ पंत ट्रोल, बीसीसीआयनं काय दिलं उत्तर?
एबीपी माझा वेब टीम | 31 Mar 2019 11:02 PM (IST)
पुढच्याच चेंडूवर रॉबिन उथप्पानं खरोखरच चौकार ठोकल्यानं हा सामना फिक्स तर नाही ना? अशा आशयाच्या कमेंट्स सोशल मीडियात फिरु लागल्या आहेत. पण बीसीसीआयनं यासंदर्भात चौकशी करुन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई : रिषभ पंतचं कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातलं स्टम्प माईक संभाषण सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होतं आहे. या संभाषणाला मॅच फिक्सिंगचं खोटं लेबलंही लावण्यात आलं आहे. या व्हिडीओत क्षेत्ररक्षणादरम्यान पंत, 'वैसे तो ये चौकाही है' असं म्हणतानाचं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रॉबिन उथप्पानं खरोखरच चौकार ठोकल्यानं हा सामना फिक्स तर नाही ना? अशा आशयाच्या कमेंट्स सोशल मीडियात फिरु लागल्या आहेत. पण बीसीसीआयनं यासंदर्भात चौकशी करुन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रिषभ पंतनं त्याआधी कर्णधार श्रेयस अय्यरला 'ऑफ साईडला फिल्डर वाढव, नाहीतर चौकार जाईल' असं सांगितलं होतं. पण त्यांनंतर जे ऐकू आलं त्याचं एडिटींग करुन पंतच्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात ऋषभ पंतने कोलकात्याचा सलामीचा फलंदाज ख्रिस लिनला माघारी धाडताना ऋषभ पंतने यष्टीमागे अफलातून झेलही पकडला. सातव्या षटकात कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर ख्रिस लिन पंतच्या पाठीमागून फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पंतने वेळ साधून उडी मारत सीमारेषेकडे जाणारा चेंडू पकडला. त्याच्या या कसरतीचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.