मुंबई : ईशान्य मुंबईतून भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याचा निर्णय उद्या (सोमवार, 1 एप्रिल) होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे उद्या विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा फैसला होणार आहे.

मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य ) मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने अद्याप कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. या मतदार संघातील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी रखडली असल्याचे बोलले जात आहे. ईशान्य मुंबईतून पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी किरीट सोमय्या खूप प्रयत्न करत आहेत, तसेच त्यांनी मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यामध्ये सोमय्या यांना अपयश आले.

एबीपी माझाच्या तोंडी परिक्षेत सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले की, "प्रत्येक पक्षाचे एक धोरण असते. सर्व मतदार संघातील उमेदवार एकाच दिवशी जाहीर करायचे नसतात. सोमय्यांची उमेदवारी रखडण्यामागे शिवसेनेचा विरोध हे कारण असूच शकत नाही. भारतीय जनता पक्षाची एक संसदीय बैठक होणार आहे. या बैठकीत ईशान्य मुंबईच्या उमेदवारीचा फैसला होईल."