तिरुअनंतपूरम:  रणजी चषक स्पर्धेत दिल्लीच्या 19 वर्षीय रिषभ पंतने विक्रमी शतक ठोकलं आहे. पंतने झारखंडविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 48 चेंडूत शतक झळकावलं आहे. रणजी चषकात हा नवा विक्रम ठरला आहे.

यापूर्वी नमन ओझाने 69 चेंडूत शतक झळकावलं होतं. ओझाने 2015 मध्ये कर्नाटकविरुद्ध खेळताने हे शतक ठोकलं होतं.

दरम्यान, आज रिषभ पंतने झारखंड विरुद्ध त्रिवेंदरममध्ये अक्षरश: वादळी खेळी केली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या पंतने शतक पूर्ण करण्यास अवघे 48 चेंडू घेतले.

रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने उपहारापर्यंत 4 बाद 374 धावांची मजल मारली. मिलिंद नाबाद 15 आणि रिषभ पंत 66 चेंडूत नाबाद 135 धावांवर खेळत आहेत.

पंतचं यंदाच्या 2016/17 हंगामातील हे चौथं शतक आहे. यापूर्वी त्याने एक त्रिशतकही ठोकलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अवघ्या सहाव्या खेळीतील हे त्याचं चौथं शतक आहे. यापूर्वी त्याने 146, 308, 24, 60 आणि117 धावांच्या खेळी साकारल्या आहेत.